आजरा : आजरा महाविद्यालय, आजरा येथील इंग्रजी विभाग (Senior Wing) यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘Alumni Interaction Activity’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवातून प्रेरणा मिळावी, तसेच शिक्षणानंतरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. शेखर शिऊडकर यांच्या स्वागत व परिचयाने झाली. त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना महाविद्यालयातील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांच्यातील संवादाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. पाऊलीन संतान मस्कारनेस (प्राथमिक शिक्षिका) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच संवादकौशल्य, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांना महत्त्व द्यावे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. रमेश चव्हाण होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी माजी विद्यार्थ्यांचे अनुभव हे वर्तमान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतात, असे मत व्यक्त केले. महाविद्यालयाशी असलेले माजी विद्यार्थ्यांचे नाते अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. माजी विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात झालेल्या संवादामुळे शैक्षणिक तसेच व्यावसायिक क्षेत्रातील विविध पैलूंवर विचारांची देवाणघेवाण झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शेखर शिऊडकर यांनी केले, तर प्रा. संदीप देसाई यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, प्राध्यापकवर्ग, माजी विद्यार्थी आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले.
विद्यार्थी–माजी विद्यार्थी यांच्यातील स्नेह, संवाद आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढविणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला.