विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे : प्रा. विनायक चव्हाण
‘राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ स्वतःसाठी जगण्याची नव्हे, तर समाजासाठी जगण्याची प्रेरणा देणारी चळवळ आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रउभारणीत सक्रिय योगदान दिले पाहिजे’, असे प्रतिपादन प्रा. विनायक चव्हाण यांनी केले. आजरा महाविद्यालय, आजरा येथे राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाचे औचित्य साधून ‘राष्ट्र उभारणीत NSS चे योगदान’ या विषयावर व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
प्रा. विनायक चव्हाण पुढे म्हणाले की, शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून समाजाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करणारे माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांविषयी संवेदनशील राहून राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरांच्या विश्वबंधुत्वाच्या विचारातून प्रेरणा घेत समाजातील प्रत्येक घटकाविषयी ममता आणि सामाजिक संवेदना जोपासण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांच्या जीवनात मोठे बदल होत असून, मोबाईल व तंत्रज्ञानाचा विधायक वापर करून समाजात सकारात्मक विचार रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समाजजीवनाशी जोडता येते. पाटोदा, हिवरे बाजार यांसारख्या भागांतील जलव्यवस्थापन, स्वच्छता अभियान, ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक प्रबोधन आदी उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, श्रमप्रतिष्ठा आणि सेवाभाव निर्माण होतो, असे प्रा. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य प्रा. डी. पी. संकपाळ यांनीही मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा ही शिक्षणाशी जोडलेली असून तरुणांमध्ये राष्ट्रजागृती निर्माण करणे, कर्तव्याची जाणीव विकसित करणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे NSSचे महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
कनिष्ठ विभागाचे एनएसएस प्रकल्पाधिकारी प्रा. रत्नदीप पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रा. मनोज पाटील, वरिष्ठ विभागाचे एनएसएस प्रकल्पाधिकारी डॉ. अविनाश वर्धन, सहाय्यक प्रकल्पाधिकारी डॉ. लता शेटे, प्रा. स्वाती माने, प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. किरण पोतदार व कार्यालयीन अधीक्षक मा. योगेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे आभार प्रा. अनुराधा मगदूम यांनी मानले, तर प्रा. रुपाली पिळणकर यांनी सूत्रसंचालन केले.