युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून स्वतःचे आरोग्य, कुटुंब आणि समाजाचे भविष्य सुरक्षित ठेवावे, असे प्रतिपादन प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी केले. ते आजरा महाविद्यालय, आजरा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 'नशामुक्त अभियान, कोल्हापूर' अंतर्गत आयोजित प्रबोधनपर व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पोतदार होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प कृतीत उतरवून समाजात जनजागृतीचे कार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. डी. पी. संकपाळ, पर्यवेक्षक श्री. मनोज पाटील तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. . मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी व्यसनाधीनतेचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम स्पष्ट करत युवकांना तंबाखू, गुटखा, मद्य आणि इतर अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून त्यांनी गावागावात नशामुक्तीचा संदेश पोहोचवावा, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रा. रत्नदीप पवार यांनी सर्व उपस्थितांना नशाविरोधी शपथ दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. अविनाश वर्धन यांनी स्वागत व प्रास्ताविक करून अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट केली. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अविनाश वर्धन व प्रा. रत्नदीप पवार यांनी केले. तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. रणजित पवार, डॉ. लता शेटे, प्रा. अनुराधा मगदूम, प्रा. अनिल निर्मळे व सौ. स्वाती माने यांचे सहकार्य लाभले. सौ. रुपाली पिळणकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.