आजरा महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा : 11/07/2026

आजरा महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा : 11/07/2026

आजरा महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा
आजरा, दि. ११ जुलै : आजरा महाविद्यालय, आजरा येथील भूगोल व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये लोकसंख्या, शाश्वत विकास आणि पर्यावरणीय समतोल याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. रणजित पवार यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व, लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणारी आव्हाने आणि त्यावर उपाययोजनांची आवश्यकता यावर प्रकाश टाकला.
यावेळी प्रमुख व्याख्याते डॉ. राम मधाळे यांनी "लोकसंख्या वाढ, संसाधनांचे व्यवस्थापन आणि शाश्वत विकास" या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी वाढती लोकसंख्या, नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण, नागरीकरण, पर्यावरणीय समस्या तसेच कुटुंब नियोजन, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना उदाहरणांसह समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनीही व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. जिज्ञासा व. उपराटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेंद्र जाधव यांनी केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. लोकसंख्येबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जबाबदारी आणि शाश्वत विकासाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यात हा कार्यक्रम उपयुक्त ठरला