आजरा-गडहिंग्लज मार्गावर २०० देशी वृक्षांची लागवड :18/07/2026

आजरा-गडहिंग्लज मार्गावर २०० देशी वृक्षांची लागवड :18/07/2026

महाराष्ट्र शासनाच्या 'तीनशे कोटी वृक्षलागवड अभियान' अंतर्गत आजरा महाविद्यालय, आजरा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि सरपंच परिषद, मुंबई महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आजरा-गडहिंग्लज मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा २०० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, हरित महाराष्ट्राची निर्मिती आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

          कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी वृक्ष हे पर्यावरणाचे फुफ्फुस असून प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन सरपंच परिषद, मुंबई (महाराष्ट्र) चे जिल्हाध्यक्ष मा. श्री. जी. एम. पाटील यांनी केले. रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या देशी वृक्षांमुळे भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यास, जैवविविधतेचे संवर्धन करण्यास तसेच प्रवाशांना सावली उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

          या उपक्रमामध्ये आजरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रकल्पाधिकारी डॉ. अविनाश वर्धन, प्रा. रत्नदीप पवार, प्रा. अनिल निर्मळे,  प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, स्वयंसेवक, प्राध्यापक, कर्मचारी, सरपंच परिषद, मुंबई महाराष्ट्रचे पदाधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पोतदार, अधिक्षक श्री. योगेश पाटील यांचे सहकार्य लाभले. 

सहभागी सर्वांनी लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन व संरक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला.